कुख्यात गुंड संदीप मोहोळ खूनप्रकरणी विशेष मोक्का न्यायालयाने तिघांना जन्मठेप व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली; तर अन्य १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी हा निकाल दिला असून, १४ वर्षे तीन महिने १८ दिवसांनी या खटल्याचा निकाल लागला.

टोळीच्या वर्चस्ववादातून खून

सचिन निवृत्ती पोटे, जमीर मेहबूब शेख, संतोष रामचंद्र लांडे या तिघांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

टोळीच्या वर्चस्ववादातून संदीप मोहोळ याचा चार ऑक्टोबर २००६ रोजी पौड फाटा येथे गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला होता. याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी एकूण १८ जणांना अटक केली होती. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का), खून, आर्म अॅक्टसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२४ वर्षांनी निकाल

विशेष मोक्का न्यायालयापुढे हा खटला चार एप्रिल २००७ मध्ये दाखल झाला. सरकार पक्षातर्फे तत्कालीन जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार व विलास पठारे यांनी काम पाहिले.

या खटल्यात ७६ साक्षीदार तपासण्यात आले. बचाव पक्षातर्फे अॅड. सुरेशचंद्र भोसले, ॲड. चिन्मय भोसले, अॅड. सुधीर शहा, अॅड. हर्षद निंबाळकर, ॲड. एन. डी. पवार, ॲड. सुदीप पासबोला, अॅड. राहुल वंजारी, अॅड. अतुल पाटील, अॅड. धैर्यशील पाटील, अॅड. जितेंद्र सावंत, अॅड. राहुल भरेकर, अॅड. विपुल दुशिंग यांनी बाजू मांडली.

काय आहे प्रकरण ?

संदीप मोहोळच्या टोळीतील गुंडांनी मारणे टोळीतील अनिल मारणे याचा २००५ मध्ये टोळी युद्धातून खून केला होता.

त्याचा सूड घेण्यासाठी २००६ मध्ये संदीप मोहोळ याचा पौड परिसरात खून करण्यात आला होता, असे पोलिस तपासातून स्पष्ट झाले होते.

खटल्यातील १२ जणांची निर्दोष मुक्तता

या प्रकरणी १८ जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी संजय कानगुडे, समीर शेख, सचिन मारणे, गणेश मारणे, राहुल तारू, अनिल खिलारे, विजय कानगुडे, दीपक मोकाशी, शरद विटकर, नीलेश माझीरे, रहीम शेख, दत्तात्रय काळभोर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पांडुरंग मोहोळ, दिनेश आवजी, इंद्रनील मिश्रा यांचा खटला सुरू असताना मृत्यू झाला.