दौंड तालुक्यातील खडकी हद्दीतील शितोळेवस्ती क्रमांक एक जवळ सोमवारी पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींपैकी तीन दरोडेखोरांना सिनेमा स्टाईल पाठलाग करीत पकडण्यात दौंड पोलिसांना यश आले असून दोन आरोपी अंधार व उसाच्या शेताचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

ताब्यात घेतलेले आरोपी पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील असून त्यांच्याकडून तीन दुचाकी, तीन धारदार सत्तुर, एक गुप्ती, ग्रिल वायर व मिरची पाकीट जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांचा सुगावा लागताच पलायन

खडकी हद्दीतील शितोळेवस्ती क्रमांक एक येथील पुलाजवळ सोमवारी पहाटे काही अज्ञात व्यक्ती संशयीतरित्या वावर असल्याची माहिती पोलिसांना मिळताच दौंडचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सहकाऱ्यांच्या पथकासह तातडीने खडकी येथे गेले.

Advertisement

पोलिस पथक आल्याचा सुगावा लागताच दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले पाचही आरोपी दुचाकी सोडून अंधार व बाजूच्या उसाच्या शेताचा फायदा घेऊन पसार होण्याचा प्रयत्न केला.

सापळा रचून अटक

पोलिस निरीक्षक व पथकातील कर्मचाऱ्यांनी शिताफीने सापळा रचून दोन आरोपीना पाठलाग करून पकडले, तर एका आरोपीला उसाच्या शेतात सरीमध्ये झोपलेल्या अवस्थेत पकडले; मात्र दोन आरोपी अंधार व ऊसाच्या शेताचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

हे आहेत दरोडेखोर

पकडलेल्या आरोपींकडून तीन दुचाकी दुचाकी, तीन धारदार सत्तुर, एक गुप्ती, ग्रिफ वायर व मिरची पूड इत्यादी दरोडयासाठी लागणारे साहित्य जप्त केले.

Advertisement

दरोडा टाकण्याच्या तयारीतील गौरव भारत कुदळे ( रा. भोईरनगर आकुर्डी, पिपरी चिंचवड पुणे ), लहू उर्फ लाल्या अंकुश भिसे ( रा. पिंपरी चिंचवड पुणे ), महेश बाबूराव पाटील ( रा. दत्तनगर, थेरगाव, पिंपरी-चिंचवड पुणे ) या तीन आरोपींना अटक केली. त्यांचे आणखी दोन साथीदार आरोपी फरारी झाले आहेत.