Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

टायगर ग्रुप हा वादाच्या भोवऱ्यात : जिल्हाध्यक्षाला खुन प्रकरणात अटक !

नवी मुंबईमधील कामोठे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील फरार टायगर ग्रुपच्या रायगड जिल्हाध्यक्षाला पोलिसांनी अटक केली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने सोमवारी (दि.२१) चिंचवड येथे ही कारवाई केली.

निलेश रमेश चव्हाण (वय ३०, रा. साक्षी पार्क मालेवाडी स्टॉप, सुकापुर ता. पनवेल, जि. रायगड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईमधील कामोठे पोलीस ठाण्यात एका वर्षांपूर्वी दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात चव्हाण हा फरार होता.

तो चिंचवडमधील क्विन्स टाऊन सोसायटीसमोर येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार आशिष बोटके आणि प्रदीप गोडांबे यांना मिळाली.

त्यानुसार सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करून पुढील तपासासाठी कामोठे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपी चव्हाण हा टायगर ग्रुपचा रायगड जिल्हाध्यक्ष आहे. तसेच एका आठवड्यापूर्वी टायगर ग्रुपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षाने साथीदारांच्या मदतीने सुपारी घेऊन व्यावसायिकाचे अपहरण करत खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला होता.

या प्रकरणी वाकड पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. टायगर ग्रुप हा राज्यभरात पसरला असून त्याचे सदस्य निमंत्रण नसतानाही पोलिसांच्या अनेक कार्यक्रमात येऊन पोलिसांशी संपर्क वाढवतात असे स्वत: पोलीस आयुक्तांनी सांगितले.

पोलिसांच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन ते फसवणूक, दमबाजी, खंडणी वसूल करणे असे गुन्हे करत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

यामुळे टायगर ग्रुप हा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून संबंधित ग्रुपच्या नावाने अपप्रकार घडत असल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a comment