राज्य सरकारने सायंकाळी चार वाजेपर्यंत व्यवहार सुरू करायला परवानगी दिली आहे. त्याचा परिणाम शेतीमालाच्या व्यवहारावर झाला आहे. वेळेच्या मर्यादेमुळे मार्केट यार्डातील घाऊक आणि किरकोळ बाजारातील खरेदी ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.

भाव घटले

एकीकडे सरकार शेतीविषयक कामांना परवानगी देत आहे, तर दुसरीकडे बाजारात आलेला माल विकण्यासाठी वेळेची मर्यादा घातली आहे. त्यामुळे बाजारात आलेला माल विकायचा कसा, असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे.

पालेभाज्या व फळभाज्या हा नाशवंत माल आहे, तर फळे, भुसार मालाच्या खरेदीत ही मोठी घट झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारातून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करून करायचे तरी काय, असा प्रश्न किरकोळ विक्रेते करीत आहेत.

Advertisement

वेळेत खरेदीसाठी कसरत करावी लागत आहे. ग्राहकांअभावी विक्रेत्यांनी मालाची खरेदी कमी केली आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील बाजारात मोठ्या प्रमाणात माल शिल्लक राहात आहे. परिणामी दर घटले आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

विक्रीसाठी वेळ वाढवून मिळावा : घुले

फळभाज्या व पालेभाज्यांची बाजारात आवक वाढली आहे. शेतकऱ्यांना माल वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे; मात्र किरकोळ बाजारात भाजी विकण्यास सायंकाळी चारपर्यंतच परवानगी देण्यात आलेली आहे.

भाजीपाल्याची विक्री विशेषतः सायंकाळी जास्त प्रमाणात होत असते. त्यामुळे किमान भाजीपाला विकण्यास सायंकाळी सातपर्यंत परवानगी दिली पाहिजे. घाऊक बाजारातून भाजीपाला खरेदी करून चारच्या आत विकणे किरकोळ विक्रेत्यांना अवघड जात आहे.

Advertisement

त्यामुळे ते कमी प्रमाणात माल खरेदी करत आहेत. त्यामुळे मार्केट यार्डातील मालाची विक्री कमी झाली आहे, असे मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी सांगितले.

भुसार विभागात ग्राहकांची प्रतीक्षा

व्यापाऱ्यांवर ग्राहकांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. वेळेच्या मर्यादेमुळे खरेदी-विक्रीचे गणित कोलमडले आहे. वेळेच्या मर्यादा घालण्यात आल्याने भुसार विभागातील व्यापाराला फटका बसला आहे.

सायंकाळी पाचनंतर संचारबंदी लागू आहे. त्यामुळे या विभागातील खरेदीला येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्याचा फटका व्यापाराला बसला आहे, असे दि पुना मर्चंट्स चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी सांगितले.

Advertisement