स्वतःच्या जीवाची, आरोग्याची पर्वा न करता इतरांचे जीवन सुरक्षित करणा-या कचरा वेचकांना कोविड भत्त्यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. संकटाच्या काळात कमी उत्पन्न असलेल्या कचरा वेचकांनी जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुरक्षेची हमी नाही

कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या कचरा वेचकांचा जीव टांगणीला आला आहे. सद्यस्थितीत प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारकडून सुरक्षेची हमीही दिली नसल्याचे यांच्याकडून सांगण्यात आले. टाळेबंदीनंतर कचरा वेचकांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम झाले आहेत.

मूलभूत सुरक्षेसाठी काय करायचे ?

३० लाख नागरिक व ११५ नगरसेवकांनी लेखी पाठिंबा देऊनही, करोडो रुपये खर्च करून कचरा वेचकांच्या उपजीविकेचे कंत्राटीकरण करण्याच्या चर्चा महानगरपालिकेत जोर धरतात; परंतु उत्पन्नासाठी सहाय्य आणि जीवन विमा यासारख्या त्यांच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Advertisement

आपल्या मूलभूत सुरक्षेसाठी कचरा वेचकांनी आता अजून काय करायचं? अस सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

कोणतीही आर्थिक मदत नाही

दारोदार जाऊन कचरा गोळा करणारे ३५०० कचरा वेचक नागरिकांकडून मिळणारे मासिक शुल्क व कागद, प्लॅस्टिक, मेटल, काच यासारखा भंगारचा माल विकून त्यावर आपला उदरनिर्वाह करतात.

टाळेबंदीमध्ये दररोज कामावर येऊनसुद्धा सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा आणि व्यवसाय बंद असल्याने त्यांना या ठिकाणाहून कोणतेही भंगार मिळाले नाही.

Advertisement

रिसायकलिंग करणाऱ्या संस्था आणि भंगारची दुकाने देखील बंद असल्याने, कचरा वेचकांचे उत्पन्न ५० टक्क्याने कमी झाले. पालिकेकडून अजून कोणतीही आर्थिक मदत त्यांना मिळालेली नाही