कोरोनाच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारची कोंडी केली. भाजपनं सरकारविरोधात आंदोलनं सुरू केली आहेत.

कोरोना काळात नियम धाब्यावर बसवून होत असलेली ही आंदोलनं सरकारची डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळं भाजपच्या नेत्यांना आवरण्याचं साकडं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले आहे.

गर्दीचा मुद्दा

कोरोनाच्या आढाव्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत झालेल्या ऑनलाइन बैठकीत ठाकरे यांनी गर्दीचा मुद्दा मांडला.

Advertisement

या काळात सावध भूमिका म्हणून राजकीय कार्यक्रम, सभा, मेळाव्यांसाठी देशाच्या पातळीवरच धोरण आखण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, असेही ठाकरे यांनी सूचविले.

पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेआडून ठाकरे यांनी विरोधकांना रोखण्यासाठी नवा उपाय शोधला आहे.

रस्त्यांवर उतरून आंदोलने, मोर्चा, मेळावे घेऊन ठाकरे सरकारची कोंडी करणाऱ्या विरोधकांना म्हणजे भाजप नेत्यांना रोखण्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविली असून, कोरोना टाळण्याचा भाग म्हणून राजकीय कार्यक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवरच धोरण आखण्याचा आग्रह ठाकरे यांनी धरला आहे.

Advertisement

हे धोरण आणून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकडेही त्यांनी लक्ष्य वेधल्याने मोदींच्या धोरणाची उत्सुकता आहे.

कार्यक्रमांचा सपाटा सुरू

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातून ठाकरे सरकार आणि भाजप नेत्यांमधील राजकीय वैर वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत मराठा, ओबीसी आरक्षण, मंत्री, आमदारांच्या चौकशा, १२ आमदारांच्या निलंबनावरून सरकार विरोधक आमने-सामने येत आहेत.

सरकारविरोधात लोकांत जाऊन आंदोलने करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाही. कोरोनाचे संकट अजूनही संपले नसतानाही आंदोलने, मोर्चामुळे लोकांची गर्दी होत आहेत.

Advertisement

त्यात आरक्षणावरून राज्यात सर्वत्र मेळावे, बैठका होत आहेत. सध्याच्या स्थितीत अशा प्रकारे गर्दी न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना केले होतेस तरीही कार्यक्रमांचा सपाटा सुरू राहिला.

सत्ताधाऱ्यांचीही गर्दी

विरोधकांकडून आंदोलने, मोर्चा काढले जात असले, तरी सत्ताधाऱ्यांकडून म्हणजे, शिवसेनेने शिवसंपर्क अभियान हाती घेतले आहे. याआधी युवासेनेने मेळावे घेतले. त्यामुळेही गर्दी होत आहे.

महागाईविरोधात काँग्रेसने मोदी सरकारविरोधात आंदोलनाचा सपाटा लावला असून, पक्षसंघटनेचे मेळावे वाढले आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबाबतच्या मोदी यांच्या धोरणामुळे सत्ताधाऱ्यांवरही वचक राहणार आहे.

Advertisement