अनिल देशुख यांची आज ईडी करणार चाैकशी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अगोदर नोटीस बजावूनही ते चाैकशीला हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना आता पुन्हा समन्स बजावले आहे. देशमुख आज ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या कथित वसुलीचा आरोप केला आहे. याच प्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे.

ईडीच्या हाती पुरावे

देशमुख यांच्या विरोधातील सर्व पुरावे आता ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्यांनाही अटक होईल. देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

त्यामुळे त्यांनाही अटक होईल”, अशी माहिती देशमुख यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अॅचड. जयश्री पाटील यांनी दिली आहे.

तसेच या प्रकरणात पडू नका, म्हणून धमकी देण्यात आली, असा आरोप त्यांनी केला; पण तरीही आपण घाबरणार नसून लढा सुरु ठेवणार, असं त्यांनी सांगितलं.

जयश्री पाटील नेमकं काय म्हणाल्या?

“मी ईडीच्या कारवाईवर समाधानी आहे. कारण सीबीआयने जो गुन्हा दाखल केला आहे, तो माझ्या तक्रारीवर उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्यानुसार दाखल केला आहे. ईडीनेदेखील माझ्या तक्रारीवर देशमुख यांच्यावर कारवाई केलेली आहे.

पीडित लोकांची माहिती मी दिली आहे, जे देशमुखांच्या भ्रष्टाचाराने पिळले जात होते. त्यामुळे देशमुख यांना अटक केली पाहिजे, अशी माझी मागणी होती. कारण अटक केली नाही तर ते पुरावे नष्ट करु शकतात”, असं जयश्री पाटील म्हणाल्या.

पवार, सुळे यांचा मला धमकी देण्यामागे हात

“मला धमकीचे फोन आले. त्याबाबतचे पुरावे मी दिले आहेत. या धमकी देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा हात आहे. त्यांनी माझ्यावर कशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्याबाबत सविस्तर माहिती मी ईडीला दिलेली आहे.

माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. देशमुख यांच्यावर कुणाचाही हात असला तरी त्यांना अटक होईल. माझ्याकडे बारमालकांनी पुरावे दिले होते,” असंही पाटील यांनी सांगितलं