पोलिस अधिकाऱ्याच्या नावाने माहिती अधिकार कार्यकर्त्यास गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघा तोतया पत्रकारांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे आहेत तोतया पत्रकार

राहुल कांबळे व जहीर मेमन अशी अटक केलेल्या तोतया पत्रकारांची नावे आहेत. या प्रकरणी सुधीर रामचंद्र आल्हाट (वय ५१, रा. नरवीर तानाजी वाडी, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली. आल्हाट हे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत.

काही दिवसांपूर्वी कांबळेने आल्हाट यांना फोन करून भेटायला बोलाविले होते. त्याप्रमाणे आल्हाट हे कांबळे व मेमन यांना एका हॉटेलात भेटले. तुमच्याविरुद्ध पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करून तुम्हाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

तुम्हाला या प्रकरणातून वाचायचे असेल तर आम्हाला दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे या कथित पत्रकारांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याला सांगितले.

अटकेची धमकी

तुम्ही दोन लाख रुपये दिल्यास सुरक्षित राहाल, नाहीतर पोलिस अधिकारी तुम्हाला आतच टाकतील, अशी धमकी दिली. राहुल कांबळे याने पोलिस अधिकारी, वकील व इतर दोन ते तीन जणांना फोन करून सुधीर आल्हाट यांच्या विरुद्ध आम्ही केलेल्या तक्रारी मागे घेत आहोत, असे सांगितले.

यानंतर आल्हाट यांनी दोघांना ७५ हजारांची रक्कम दिली; मात्र उर्वरित सव्वा लाख रुपयांसाठी दोघांनी आल्हाट यांच्याकडे तगादा लावला. या प्रकाराला वैतागून आल्हाट यांनी खंडणी विरोधी विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

Advertisement