पर्यटकांना बंदी घालूनही ते ऐकायला तयार नाहीत. पावसात चिंब होण्यासाठी पर्यटकांची पावले जुन्नरकडे वळली आहेत. गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्र पूर्णपणे बंद आहे.

याचा फटका जुन्नर येथील पर्यटनालाही बसला आहे. वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांकडून पोलिसांनी जवळपास 30 हजारांचा दंड वसूल केला आहे.

जुन्नरच्या कांचन धबधब्यावर गर्दी

पावसाळा आला की निसर्गसंपन्न जुन्नरमध्ये पर्यटनाला बहर येतो. हिरव्यागार गालिचांच्या विस्तीर्ण पठारावर धुक्याची चादर पसरते. पावसाचे तुषार अंगावर झेलताना डोळ्यांचे पारणे फेडणारा कांचन धबधबा समोर दिसतो.

Advertisement

सध्या जुन्नरच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे येथील धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेला आंबेहातविजचा कांचन धबधबाही कोसळत असल्याने तो नेहमीच पर्यटकांनी हाऊसफुल असतो.

पावसात कांचन धबधबा पाहण्यासाठी आता तरुणाई आणि सहकुटुंब पर्यटकांची पावले तिकडे वळली आहेत.

पर्यटकांकडून दंड वसुली

दरम्यान, कोव्हिडसंबंधी निर्बंधामुळे तिथे पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. इथे फिरायला गेलेल्या 57 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 29 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Advertisement

पहिलीच कारवाई असल्याने केवळ दंडात्मक तरतूद करून सोडून देण्यात आले आहे. यापुढे सरसकट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जुन्नर पोलिसांनी दिला आहे.