ठाणेः पुण्याच्या नगररचना सहसंचालकांच्या बेहिशेबी मालमत्तेने संपूर्ण राज्याच्या भिवया उंचावल्या असताना आता जमीन घोटाळ्यात मीरा भाईंदरच्या नगररचनाकाराला अटक करण्यात आली. तो बराच दिवस बेपत्ता होता.

बोगस दाखले देऊन कोट्यवधींची फसवणूक

मीरा भाईंदर महापालिकेचे तत्कालीन नगररचनाकार दिलीप घेवारे यांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली आहे.

यूएलसी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असलेले घेवारे हे गेल्या अनेक दिवसांपासून फरार राहून अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात होते.

मीरा भाईंदरमध्ये २००० मध्ये कमाल जमीन धारणा कायदा लागू असतानाही तो लागू नसल्याचे अनेक बोगस दाखले देऊन त्यांनी शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

घेवरेच्या साथीदाराला अगोदरच अटक

महानगरपालिका हद्दीतील भाईंदर पूर्व येथील सर्व्हे क्र. ६६३ आणि ६६४ या भूखंडावरील गैरव्यवहाराबाबत पाच वर्षांपूर्वी ठाणे नगर पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याच गुन्ह्यातील त्यांचे साथीदार सत्यवान धनेगावे यांना यापूर्वी पोलिसांनी अटक केलेली आहे; मात्र दिलीप घेवारे गेल्या दोन आठवड्यांपासून फरार होता आणि अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू होते.

अटकपूर्व जामिनाअगोदर अटक

गुरुवारी त्याच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी सत्र न्यायालयात ठेवण्यात आली होती; मात्र सुनावणीपूर्वीच त्याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने गुजरातमधल्या सुरत परिसरातून अटक केली आहे. त्यांना २८ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.