पुणे – दिवाळीच्या (Diwali) सुट्टीत गावी आलेले चाकरमानी पुन्हा एकदा पुण्या मुंबईच्या परतीच्या प्रवासाला लागले आहेत. चाकरमानी दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपल्या घरी केल्यानंतर आपल्या गावाकडे जातात. त्यामुळे ऐन दिवाळीत चाकरमान्यांनी आपल्या गावाकडची वाट धरली होती. शाळेतील सहामाहीच्या परीक्षा संपल्या होत्या. तसेच दिवाळीला (Diwali) सुरुवात झाली आणि त्याआधी आलेल्या साप्ताहीक सुट्टीची संधी साधून अनेकांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, आता दिवाळीच्या सुट्टी संपली असून पुन्हा एकदा गावाकडे आलेले चाकरमानी पुणे-मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सातारा-पुणे महामार्गा वाहनांच्या गर्दीने हाऊसफुल्ल (Traffic Jam) झाला आहे.

महामार्गावर अनेक किमींच्या रांगा (Traffic Jam) लागल्याने वाहतूक संथ गतीने सुरु होती. साताऱ्यातील सर्व बस स्थानकावरही तुडूंब गर्दी होती. दिवाळीच्या सलग सुट्ट्या संपल्याने पुणे- बंगळूर महामार्गावर कराड, सातारा खंबाटकी घाट, शिरवळ परिसरात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.

त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

यावेळी महामार्गावर मोठी गर्दी होती. खड्ड्यात हरवलेल्या महामार्गावरून व सेवा रस्त्यावरून वाट शोधताना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली. वेळे परिसरात खंबाटकी बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे कासव गतीने वाटून चालू असल्याचे पाहायला मिळाले.

महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तर काही वाहने बंद पडू लागल्याने वाहतूक कोंडीत आणखीच भर पडत होती.

प्रत्येक सणासुदीला व सलग सुट्ट्याना महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर आल्यावर या समस्या नित्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने देखील यादी लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य नागरिक आणि वाहन चालकांकडून होताना दिसून येत आहे.