पुणे – पुण्यात वाहतूक कोंडीची (Traffic Jam) समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील पुणे-सोलापूर या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. पुण्याच्या (Pune) हडपसर परिसरात वाहनांच्या लाबं रांगा लागल्या आहेत. हडपसर पुलावर गेल्या तासाभरापासून वाहनं अडकून पडली आहेत. कारण दिवाळीच्या सुट्टीनिमित्त चाकरमानी बाहेर पडत आहेत. विशेषतः चाकरमानी दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपल्या घरी केल्यानंतर आपल्या गावाकडे जातात. अशातच चाकरमान्यांनी आपल्या गावाकडची वाट धरली असून, शहरातील अनेक महत्वाच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

दरम्यान, या वाहतूक कोंडीचा (Traffic Jam) फटका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनाही बसला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अंबादास दानवेंना आपल्या मार्गात बदल करावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या वाहतुक कोंडीमुळे रस्त्यावर तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे याच मार्गाने लोणी काळभोरला जाणार होते.

मात्र, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अंबादास दानवेंना आपल्या मार्गात बदल करावा लागला आहे. साप्ताहीक सुट्टी आणि दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

शाळेतील सहामाहीच्या परीक्षा संपल्या आहेत. तसेच आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. त्याआधी आलेल्या साप्ताहीक सुट्टीची संधी साधून अनेकांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अतिरिक्त वाहतुक वाढली आहे.

शिवाय मोठी आणि अवजड वाहने यांमुळे वाहतुक धीम्या गतीने होते. या प्रचंड मोठ्या वाहतुकीवर नियंत्रण करणाऱ्या वाहतुक पोलिसांची संख्याही कमी असल्याने ही वाहतुक कोंडी होत आहे.

दरम्यान, करोनाच्या प्रादुर्भावामुळे जी नियमावली प्रशासनाच्या वतीने लागू करण्यात आली होती. ती आता शिथील झाली आहे. त्यामुळे लोकांचा प्रवासही वाढला आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त चाकरमान्यांनी गावाची वाट धरली आहे. आणि याचा ताण मुंबई-पुणे महामार्गावर आल्याचं चित्र दिसत आहे.