पुणे – दिवाळीचा उत्सव हा (Diwali) फराळ व फटाक्यांची आतीषबाजी, आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघणारा आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोना (Corona) महामारीच्या साथीमुळे सर्वांनाच दिवाळीचा सण निर्बंधांमध्ये साजरा करावाला लागला होता. मात्र, यंदाच्या वर्षी करोनाचा (Corona) आलेख पूर्ण पणे खाली आला असून, मोठ्या आनंदात दिवाळीचा (Diwali) सण साजरा होत आहे.

दरम्यान, या दिवाळीच्या निमित्ताने राजकीय हेवेदावे विसरून पुण्यातील राजकीय मंडळी वाडेश्वर कट्ट्यावर (Wadeshwar Katta) एकत्र येतात. यंदाही दिवाळी फराळानिमित्त सर्वपक्षीय राजकीय नेते वाडेश्वर कट्ट्यावर (Wadeshwar Katta) एकत्र दिसून आले आहे.

पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसाठी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यक्रमाच्या आयोजनावरुन भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) चांगल्याच संतापल्या आहेत. सध्या त्यांची पोस्ट सोशलवर तुफान व्हायरल होत आहे.

कालच पुण्यात पंधरा वर्षे आमदार असलेले विनायक आबा निम्हण यांचे निधन झाले. त्यांना जाऊन 24 तासही झाले नसताना सर्वपक्षीय नेत्यांनी दिवाळी फराळाचे आयोजन केले.

यावरुन त्यांनी ”राजकारणी इतके निर्लज्ज कसे काय असू शकतात?” असा सवाल आज केला. दरवर्षी पुण्यातील सर्वपक्षीय नेते दिवाळी निमित्त वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र येतात.

राजकीय टोलेबाजी करणारे राजकारणी मांडीला मांडी लावून एकमेकांच्या आनंदात सहभागी होतात. सोबत फराळ करतात आणि मनभेदही दुर करतात. या कार्यक्रमाचे काल आयोजन करण्यात आले होते. त्यांनी एकमेकांसोबत फराळही केला.

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये तृप्ती देसाई म्हणतात…

‘आज वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय राजकीय लोकप्रतिनिधींसाठी सकाळी फराळ आयोजित करण्यात आला होता, खरंतर हा कार्यक्रम पुढे ढकलता आला असता.

कालच पुण्यात पंधरा वर्षे आमदार असलेले विनायक आबा निम्हण यांचे अचानक निधन झाले, त्यांना जाऊन 24 तास पण झालेले नाहीत. आज फराळ करताना, पदार्थांवर ताव मारताना वाडेश्वर कट्ट्यावर दिसलेले आबांचे हे सर्वच सहकारी आणि जवळचे मित्र परंतु एन्जॉय करताना दिसले.

कदाचित कट्ट्यावर श्रद्धांजली ही यांनी वाहिली असेल परंतु त्यांना दिलेला अग्नी अजूनही शांत झालेला नसताना हे जे सर्व झाले त्याचा निषेधच आहे.

आबांवर जी वेळ आली ती सर्वांवरच एक दिवस येणार आहे, परंतु राजकारणी इतके निर्लज्ज कसे काय असू शकतात हाच मोठा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्तीला पडलेला आहे’, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.