शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी बुधवारी सायंकाळी ५.३१ वाजता अखेरचा श्वास घेतला.

सायंकाळी ६.३० वाजता कोरोनाचे शासकीय नियम पाळत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर घराजवळील शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच आयुर्वेदिक पद्धतीने उपचार सुरू होते.

शिवशंकरभाऊ पाटील यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते. त्यानंतर त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षी सेवाकार्यात झोकून घेतले. शेगाव संस्थानमध्ये त्यांनी विविध उपक्रम राबवले. श्री गजानन शिक्षण संस्था स्थापन करून त्या माध्यमातून शेगाव इंजिनिअरिंग उभारले.

Advertisement

गजानन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, तीन विवाहित मुली, नातवंडे असा आप्त परिवार आहे.

शिवशंकरभाऊंनी अाध्यात्मिक व सामाजिक कार्याची सांगड घालून नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला. मंदिर व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव असून या मंदिर व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून होती. श्रद्धा, विश्वास व भक्ती या त्रिसूत्रीवर भाऊसाहेबांनी संस्थानचा कारभार यशस्वीरीत्या सांभाळला.

 

Advertisement