वारकरी संप्रदायाची फक्त ५० लोकांसह पायी वारीची मागणी मान्य न केल्याने भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले आक्रमक झाले.

“मायबाप वारकऱ्यांनी शेवटपर्यंत सरकारच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहिली; पण सत्तेच्या नशेत गुंग झालेल्या सरकारने वारकऱ्यांच्या परंपरेला आणि भावनेला साफ धुडकावलं.

म्हणून आता आम्ही हे जाहीर करतो, की यापुढे होणाऱ्या सर्व परिणामांना फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आणि अजित पवार जबाबदार असतील.

Advertisement

आता पायी वारी होणार म्हणजे होणारच. ‘सविनय कायदेभंग’ काय असतो ते इंग्रजांनंतर या जुलमी सरकारला लवकरच दिसेल”, असा इशारा भोसले यांनी दिला.

बसमधून पालख्यांना परवानगी

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ११ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर विठ्ठलदर्शन आणि वारीबद्दल झालेल्या निर्णयाची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देहू आणि आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 लोकांना परवानगी देण्यात आली. तसेच दहा मानाच्या पालख्यांसाठी 50 जणांना सहभागी होता येईल असं सांगण्यात आलं.

Advertisement

तसेच, पालखीसोबत पायी वारी न करता प्रत्येक पालखीला दोन बसेस असं दहा पालख्यांना 20 बस दिल्या जातील, असंही राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं.

पायी वारीची परंपरा खंडित करू नये, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात असूनही राज्य सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सध्या संघर्ष निर्माण झाला आहे.

पायी वारी सोहळ्यासाठी घातलेले निर्बंध

पालखी यंदा बसमधूनच पंढरपूरकडे जाणार. लवकरच शासन त्याबद्दल सविस्तर आदेश काढणार आहे. इतर वारकरी दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणी बंधनकारक असेल.

Advertisement

काला आणि रिंगण सोहळ्याला परवानगी देण्यात आली असली, तरी त्यावरही निर्बंध आहेत. रथोत्सवलाही परवानगी आहे; पण त्यासाठी 15 वारकऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, प्रत्येक पालखीसोबत 40 वारकऱ्यांना तर प्रस्थान सोहळ्याला 100 वारकऱ्यांनाच उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.