एखाद्या अधिका-यानं पगाराच्या कितीपट रक्कम कमवावी, असं वाटतं. फारतर दहा-पंधरा पट असं कुणीही सांगेल; परंतु पुण्यातील नगर रचना सहसंचालकांनी सेवेत असताना पगाराच्या बाराशे पट मालमत्ता कमविली. त्यांना आता निलंबित करण्यात आलं आहे.

४० हजार पानांचं आरोपपत्र

नगर रचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर नोकरीच्या काळात उत्पन्नापेक्षा अधिक बेकायदा अपसंपदा बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी तब्बल ४० हजार पानांचे पहिले दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे.

उत्पन्नापेक्षा तब्बल १२०० टक्के अधिक ८२ कोटी ३४ लाख ३४ हजार ९३९ रुपये अधिक बाळगल्याचा आरोप या दोषारोपात करण्यात आला आहे.

Advertisement

दोघे तुरुंगात

हनुमंत नाझीरकर, संगीता नाझीरकर, गीतांजली नाझीरकर, भास्कर नाझीरकर, राहुल खोमणे, अनिल शिपकुळे, बाळासाहेब घनवट आणि विजयसिंह धुमाळ अशा ८ जणांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

त्यांच्यापैकी हनुमंत नाझीरकर आणि राहुल खोमणे यांना अटक करण्यात आली असून ते दोघे ३० मार्चपासून न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहेत.

लाचखोरीतून जमविली माया

हनुमंत नाझीरकर हे सध्या नगर रचनामध्ये अमरावतीला सहसंचालक म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Advertisement

२३ जानेवारी १९८६ ते १८ जून २०२० या ३४ वर्षामध्ये त्यांनी तब्बल ८२ कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता लाचखोरीतून मिळविल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या उत्पन्नापेक्षा ही मालमत्ता तब्बल ११६२ टक्के अधिक आहे.

आणखी एक आरोपपत्र दाखल होणार

नाझीरकर याच्या ३८ कंपन्या व त्यातील केलेल्या गुंतविलेला पैसा याविषयी दुसरे स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. तसेच त्याच्या २० बेनामी मालमत्ताही आढळून आल्या आहेत. त्याबाबतची वेगळी कारवाई प्राप्तिकर विभागामार्फत करण्यात येत आहे.

पत्नी, सास-यांच्या नावे मिळकत

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज हे दोषारोपपत्र शिवाजीनगर येथील न्यायालयात दाखल केले आहे. हनुमंत नाझीरकर याने ही मालमत्ता २०१० ते २०१६ दरम्यान आपली पत्नी आणि सासरे यांच्या नावावर खरेदी केली आहे.

Advertisement

त्यातील किंमती या त्याने ज्यावेळी या मालमत्ता खरेदी केल्या, त्यावेळच्या किंमती आहेत. या सर्व मालमत्ता मोक्याच्या ठिकाणी असल्याने आजच्या बाजारभावानुसार त्यांच्या किंमती दुप्पट ते तिप्पट झाल्या असतील.