Pune : आरोपी हे ओळखीसाठी मॅट्रिमोनिअल साईट्सचा वापर करत होते. केंद्र शासनात मोठ्या पदावर अधिकारी असल्याचं भासवत या आरोपींनी तब्बल २५० मुलींना फसवल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत रमेशचंद नंदवाना आणि विशाल हर्षद शर्मा अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे असून त्यांनी पुण्यातील ९१ मुली बंगळुरूमधील १४२ आणि दिल्लीतील गुडगाव येथील २२ मुलींची आर्थिक फसवणूक करून या मुलींपैकी अनेकींचे शारीरिक शोषण केलं आहे.
पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या मनीषा धारणे यांच्याकडे तीन पीडित तरुणी आल्या होत्या. त्यांनी सांगितले आमहाला एकाच व्यक्तीने फसवले आहे. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
त्यानंतर पीआय विवेक मुगळीकर हे या घटनेचा तपास करत होते. तपासाअंती पुराव्यासहित बंगुळूरपर्यंत धागेदोरे मिळाले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींकडून ५० पेक्षा अधिक बनावट ओळखपत्र, अनेक मोबाईल आणि तब्बल ७५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. हे दोघेही आरोपी एकमेकांचे मित्र असल्याचंही स्पष्ट झालं आहे.
फसवणुकीचा फंडा
मी केंद्रसरकारमध्ये उच्चपदस्थ नोकरीला आहे. काही कारणामुळे मी सध्या निलंबित आहे. पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी मला पैशाची गरज असल्याची खोटी बतावणी करायचे. अशा पद्धतीने अनेक तरुणींना त्यांनी आर्थिक गंडा घातला. तसेच काहींचे शारीरिक शोषण सुद्धा केले. एका प्रकरणात मोठ्या प्रोजेक्टसाठी ६० लाख रुपये लागणार असल्याचं सांगून आरोपी निशांतने एका आयटी कंपनीतील एचआर असलेल्या तरुणीकडून तब्बल १३ लाख रुपये उकळले आणि तिचे शारीरिक शोषणही केले.
आरोपी निशांत आणि विशालची बोलण्याची पद्धत पाहून अनेक मुलींना आरोपी फार शिक्षित नसल्याचा शंका यायची. मात्र आर्थिक फसवणुकीसह काही मुलींशी या आरोपींनी शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याने प्रतिष्ठेच्या भीतीने अनेक मुलींनी तक्रार केली नाही. अखेर पुण्यातील काही तरुणी समोर आल्याने या नराधमांचं कृत्य उघड झालं आहे.