महाराष्ट्रात बनावट मद्य विक्रीची प्रकरणे उघडकीस येत असतात. विशेषतः गोवा, दीव-दमणहून बनावट मद्य येत असते.

देशी मद्य आणि बिअरमध्ये भेसळ होत असते; परंतु आता उच्च प्रतीच्या विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये मद्य भरून विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबईच्या दोघांना पुण्यात बेड्या

उच्च प्रतीच्या विदेशी स्कॉचच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट मद्य भरुन विकणाऱ्या दोघा जणांना पुण्यात बेड्या ठोकण्यात आल्या.

Advertisement

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कात्रज परिसरात आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून साडेतीन लाख रुपयांच्या बनावट स्कॉचसह सुमारे साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक उषा वर्मा, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक संतोष घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक एस. आर. पाटील, संजय जाधव, संजय पाटील यांच्यासह भरारी पथक क्रमांक एकच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

आलिशान कारमधून आरोपी पुण्याला

विक्रम दिनेश वाघेला (वय 26 रा. कांदिवली पूर्व, मुंबई) आणि सुनील दाजी जुलूम (वय 34 रा. धारावी, मुंबई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. आरोपींना पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Advertisement

हे दोघे मुंबईवरून आलिशान मोटारीतून विविध ब्रँडच्या बनावट स्कॉचच्या बाटल्या घेऊन विक्रीसाठी पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज डेअरीसमोर आले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

भंगारातील बाटल्यांमध्ये मद्य भरून विक्री

पंचतारांकित हॉटेल्स आणि सोसायट्यांमधून भंगारमध्ये आलेल्या रिकाम्या स्कॉचच्या बाटल्यांमध्ये साधे मद्य भरून बनावट स्कॉच विकली जात होती.

 

Advertisement