file photo

पिंपरी : कोरोनामुळे गेलेल्या नोक-या, मनांत सातत्यान असणारे दडपण, नैराश्य, एकटेपण यामुळे जगण्याची उमेदच कमी झाली आहे.

त्यातून आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून, तरुण आणि वृद्धही जगण्याची आशा गमावून बसले आहेत.

आजारपणामुळे ज्येष्ठाची आत्महत्या

चिखली परिसरातील घरकुल येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या तरुणासह एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली. ज्येष्ठाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली.

रोहिदास रावजी पिंगळे (वय ६१, रा. इमारत क्रमांक बी ८, घरकुल), असे आत्महत्या केलेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. पिंगळे यांच्यावर मानसोपचार सुरू होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना आजार होता.

मुलगा, सून व पत्नी यांच्यासह ते घरकुल येथे राहत होते. रोहिदास यांचा मुलगा मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर वडील रोहिदास घरात दिसून आले नाहीत, म्हणून त्यांचा शोध घेतला; मात्र ते मिळून आले नाहीत.

त्यानंतर मुलगा कामावर निघून गेला. त्यानंतर रोहिदास यांनी सकाळी साडेसातच्या सुमारास घरकुल येथील ए १६ क्रमांकाच्या इमारतीवरून उडी मारली.

तरुणाचे आत्महत्येचे कारण अस्पष्ट

रवीकुमार अलाप्पा बलीजा (वय २०, रा. इमारत क्रमांक एफ २१, घरकुल), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ भोये यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन विद्यार्थी असलेला रवीकुमार बलीजा हा घरकुल येथे त्याच्या कुटुंबीयांसोबत राहण्यास होता.

तो राहत असलेली इमारत सात मजल्यांची असून, त्या इमारतीच्या टेरेसवर काही जण नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जातात. त्यानुसार रवीकुमार हा रविवारी सायंकाळी इमारतीच्या टेरेसवर व्यायामासाठी गेला.

त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास टेरेसवरून त्याने उडी मारली. त्याच्या घरच्यांनी त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.