पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं किरकोळ कारणातून हल्ला करण्यात आला. त्यात दोघे गंभीर जखमी असून, हा हल्ला इतका भयंकर होता, की यामध्ये एकाचे आतडे बाहेर आले आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्याची ओळख क्राईम सिटीत

मागील काही दिवसांपासून पुण्याता टोळीयुद्धाची प्रकरणं वाढत आहेत. मागील सहा महिन्यांत 139 जणांवर प्राणघातक हल्ला झाला आहे, तर 38 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराची आता ओळख क्राइम सिटीत बदलत असताना दिसत आहे. काल रात्री पुन्हा एका टोळक्यानं दोघांवर प्राणघातक हल्ला केला आहे.

Advertisement

संतोष महादेव गायकवाड आणि त्याचा मित्र खेडकर असं हल्ला झालेल्या तरुणांची नावं आहेत. संबंधित दोघं तरुण सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मद्यप्राशन करण्यासाठी हडपसर परिसरातील रायकर वस्ती परिसरात गेले होते.

काय घडले ?

टोळक्यातील एका आरोपीनं फिर्यादी संतोषला मी प्रकाश गायकवाड उर्फ गोट्या याचा मित्र आहे, असा परिचय दिला. आणि तू गोट्याला ओळखतो का? असं विचारलं. या वेळी संतोषनं गोट्या माझ्या परिचयाचा असून, तो भावासारखा असल्याचं सांगितलं.

यानंतर आरोपींनी गोट्याला फोन लाव म्हणत फिर्यादीला दमदाटी केली. या वेळी फिर्यादी संतोषला आरोपींच्या हातात कोयते असल्याचे दिसले. त्यामुळे त्यानं फोन न करता दुचाकीवर बसून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

या वेळी आरोपींनी त्याच्या पाठीत कोयत्यानं सपासप वार केले; पण फिर्यादी संतोष आपला जीव मुठीत घेऊन तेथून कसाबसा पळाला; पण त्याचा मित्र खेडेकर मात्र आरोपींच्या तावडीत गवसला.

आरोपींनी फिर्यादी संतोषचा मित्र खेडेकर याच्यावर कोयत्यानं सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, यामध्ये खेडेकरचे आतडे बाहेर आले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. ससून रुग्णालयात जखमी तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Advertisement