Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

दोन शिपायांनी मिळविली महापालिकेची कोट्यवधींची कामं

महापालिकेच्या कर्मचा-यांना महापालिकेची कोणतीही कामं घेता येत नाहीत; परंतु महापालिकेच्या दोन चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे दोन कंपन्या स्थापन करून, कोट्यवधी रुपयांची कामं मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वरिष्ठ अधिका-यांचाही त्यात हात असावा, असा संशय आहे.

दोन कोटींची कामं

मुंबई महापालिकेत चतुर्थश्रेणी शिपाई असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी आपापल्या पत्नींच्या नावे कंपन्या बनवून नियमबाह्यरित्या महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींची कंत्राटे मिळवली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागात चतुर्थश्रेणी शिपाई असलेले अर्जून नराळे, आणि मेंटेनंन्स विभागातील शिपाईपदावरचे रत्नेश भोसले यांनी आपल्या पत्नींच्या नावे कंपनी सुरु केली.

अर्जून नराळेची पत्नी अपर्णाच्या नावे असलेल्या श्री एंटरप्रायजेस या कंपनीने गेल्या दीड वर्षात 1 कोटी 11 लाख रुपयांची कामे मिळवली आहेत, तर रत्नेश भोसलेच्या पत्नी रिया भोसले याच्या आर आर एंटरप्रायजेस या कंपनीला 65 लाख रुपयांची कामे मिळाली आहेत.

कोविड सेंटरमध्ये पुरवल्या वस्तू

मुंबई महापालिका अधिनियमानुसार पालिकेत नोकरीला असलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या जवळच्या नातेवाइकाला पालिकेची अशी कंत्राटे घेता येत नाहीत; पण या दोघांनी मात्र नियम धाब्यावर बसवत स्वत:च्या पत्नींच्या नावे कंपनी खोलून कोट्यवधींची कामे मिळवली.

पालिकेच्या डी विभागात कोरोना काळात कुठलीही वस्तू लागली, तरी त्या पुरवठा करण्याचे काम या दोन कंपन्यांनी केलं.

स्क्रू ड्रायव्हरपासून कॉम्प्युटर पार्टपर्यंत आणि टेबलपासून भाड्याने गाड्या देण्यापर्यंत सर्व काही पुरवठा या दोन कंपन्यांनी केला आहे. यात कोविड सेंटरमधील रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिमीटर, इलेक्ट्रीक केबल, स्टीमर या वस्तूंचा पुरवठा केला.

अधिकाऱ्यांशी साटेलोटे

चतुर्थश्रेणीतील दोन कामगार एवढे मोठे धाडस अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याशिवाय करणं शक्य नाही.

कोरोना काळात मोठ्या प्रमाणात पालिकेच्या वॉर्ड स्तरावर खरेदी करण्यात आलेली आहे. या सर्व खरेदी व्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

 

Leave a comment