Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

बेरोजगारीमुळे तरुण गुन्हेगारीच्या विळख्यात

पुणे : कोरोना काळात अनेकांच्या नोक-या गेल्या. उद्योगधंदे बंद झाले. छोटे व्यवसाय मोडून पडले. त्यातून मोकळे हात गुन्हेगारीकडे वळले आहेत. अनेक नवीन तरुण मुले अशा टोळ्यांमध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहे.

शहरात २६ नवीन टोळ्या

या गल्लोगल्ली पसरलेल्या नव्या टोळ्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. शहर पोलिस दलाने केलेल्या पाहणीत प्रामुख्याने शहराच्या उपनगरांमध्ये अशा टोळ्या नव्याने उदयाला आल्या आहेत. शहरात सध्या २६ नव्या टोळ्या निर्माण झाल्या असून, त्यात तीनशेहून अधिक तरुण सहभागी असल्याचे दिसून येत आहे. या २६ टोळ्यांमध्ये सहभागी होणारे तरुण हे प्रामुख्याने स्थानिक आहेत. परिसरात आपले वर्चस्व निर्माण करण्यावरून त्यांच्यात मारामा-या होत असतात.

भाई ओळखीसाठी दहशत

आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करणे, दहशत निर्माण करणे, असे गुन्हे ते करत असतात. त्यातील अनेक जण आपण वस्तीमध्ये ‘भाई’ म्हणून ओळखले जावे, यासाठी असे दहशत निर्माण करणारे गुन्हे करतात. जेणेकरून पोलिस आपल्याला अटक करतील. जामिनावर सुटल्यावर वस्तीमध्ये आपले बस्तान बसवितात. लोकांकडून हप्ते वसुली करताना दिसतात. अशा १० गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. तसेच वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या गुन्ह्यांत अशा टोळ्यातील १०० हून अधिक तरुण तुरुंगात आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे निर्माण होतेय आकर्षण

कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. गेले वर्षभर कॉलेज बंद असल्याने असंख्य तरुण काहीही काम नसल्याने कट्ट्यांवर बसून गप्पा मारतात. त्याचवेळी अनेक स्थानिक भाईगिरी करणाऱ्या गुन्हेगारांचा रुबाब, त्यांची दादागिरी, आजूबाजूचे दुकानदार त्यांना देत असलेली इज्जत याचे आकर्षण या तरुणांमध्ये निर्माण होते. त्यातून ते या गुन्हेगारीकडे आकर्षित होतात. त्यांचे फोटो आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस म्हणून ठेवतात.

पोलिसांकडून समुपदेशन

कुख्यात गुंड गजानन मारणे याची तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याच्या साथीदारांनी त्याची मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून जंगी मिरवणूक काढली होती. मारणेची ही रॅली संपूर्ण राज्यात व्हायरल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी मारणेबरोबरच संघटित गुन्हेगारी टोळींविरुद्ध मोहीम उघडली. गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचा शोध घेतला. या मुलांचे भरोसा सेलमार्फत समुपदेशन करण्यात येत आहे.

Leave a comment