Maharashtra News : महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांपासून वादळी पाऊस सुरू आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र तथा खानदेश आणि कोकणातही वादळी पावसाची हजेरी लागली आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी बांधव पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. दरम्यान आज देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने पुढील 24 तासात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली असून संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे दिवसभर राज्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड उकाडा जाणवणार आहे तर जेव्हा दिवस मावळेल तेव्हा हवामानात मोठा बदल होईल आणि पावसाला सुरुवात होईल, अशी शक्यता आहे. येत्या 24 तासात कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये आज दिवसभर उकाडा जाणवणार असा अंदाज आहे. मात्र आज सायंकाळी वादळी पावसाची हजेरी लागेल आणि यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज 17 मे 2024 ला राज्यातील मराठवाडा विभागातील परभणी, बीड, नांदेड, लातूर, जालना, हिंगोली आणि विदर्भ विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्यांमधील काही भागात गारपीट देखील होऊ शकते.
तसेच या सदर भागांमध्ये जोरदार वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान या साऱ्या पार्श्वभूमीवर आयएमडीच्या माध्यमातून या संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून संबंधित भागातील नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील असे म्हटले गेले आहे.
या भागात 40 ते 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सावध राहावे असे आवाहन जाणकारांनी केले आहे.
सोबतच या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊसही हजेरी लावणार असे म्हटले जात आहे. उत्तर कोकणातील ठाणे पालघर आणि राजधानी मुंबईमध्ये देखील रिमझिम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो असे IMD ने यावेळी स्पष्ट केले आहे.
एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले वादळी पावसाचे सत्र अजूनही संपलेले नाही. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर उर्वरित शेतकऱ्यांच्या शेतीमालांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.