व्यापा-यांच्या दुकानांत जाऊन लसीकरण

निर्बंध असतानाही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्याला सुपर स्प्रेडर कारणीभूत असल्याने आता पुणे महापालिकेने दुकानात जाऊन व्यापा-यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

लक्ष्मी रस्त्यावर मोहीम

आगामी काळात कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असलेल्या व्यापाऱ्यांना दुकानात जाऊन लस देण्याची योजना महानगरपालिकेने आखली आहे.

महापालिकेच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील व्यापा-यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम गुरुवारपासून लसीच्या उपलब्धतेनुसार राबविली जाईल, अशी माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली.

याशिवाय सध्या पुणे महानगरपालिकेकडून दिव्यांग, रस्त्यांवरील नागरिक, झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे लसीकरण सुरू असल्याचेही अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

जम्बो कोविड सेंटर बंद

कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागल्यामुळे पुण्यातील जम्बो कोविड सेंटर अखेर बंद करण्यात आले आहे. जम्बोमधील रुग्ण कमी झाल्यानंतर 1 जून रोजी रुग्णालयातील 300 ऑक्सिजन खाटा कमी करण्यात आल्या होत्या.

पहिली लाट ओसरल्यानंतर जम्बो रुग्णालय 15 जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेमुळे 22 मार्चपासून जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले होते. दुसऱ्या लाटेत 22 मार्च ते 1 जुलै दरम्यान एकूण ३००९ रुग्ण जम्बोमध्ये दाखल झाले होते.

तिस-या लाटेचे संकेत

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट थोपवल्यानंतर आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत 0 ते 9 वर्षापर्यंतच्या तब्बल 7473 लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. तसेच यात एका मुलाचा दुर्दैवाने मृत्यूही झाला आहे.