पुणेः पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना अधूनमधून आखीत असते. आताही दहा रुपयांत दिवसभर कितीही वेळा प्रवासाची योजना आखण्यात आली आहे.
फडणवीस, पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
शहराच्या मध्यभागात ‘पीएमपी’च्या बसमधून दहा रुपयांत दिवसभर कितीही वेळा प्रवासाची सुविधा देणाऱ्या योजनेची शुक्रवारपासून अंमलबजावणी होणार आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन होईल.
फक्त दहा मार्गासाठीच ही योजना
या योजनेसाठी ९ मार्ग निश्चित केले असून, ५० मिडी बस त्यासाठी असतील, अशी माहिती महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, ‘‘स्थायी समितीचा अध्यक्ष या नात्याने सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडताना ही योजना सादर केली होती. तिच्या मंजुरीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे.
डिसेंबरमध्ये योजनेचा विस्तार
डिसेंबरमध्ये तीनशे बस उपलब्ध करून संपूर्ण शहरात सहा विभागांमध्ये या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. स्वस्त, गतिमान, आरामदायी, वेळेची बचत करणारा, सुरक्षित प्रवास ही या योजनेची खास वैशिष्ट्ये आहेत.
यातून वाहतुकीची कोंडी कमी होईल, पार्किंगची समस्या दूर होऊन, प्रदूषण, आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
ओळखपत्रावर तिकीट
प्रवाशाचे ओळखपत्र पाहून त्याला तिकीट देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवाशांना आधारकार्ड, पीएमपीचे ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा शासकीय सेवेत असल्याचे ओळखपत्र कंडक्टर बघेल.
त्यावरील शेवटचे चार क्रमांक तिकिटावर नमूद करण्यात येईल. त्यामुळे तिकिटाचे हस्तांतरण होणार नाही, अशी पीएमपीची अपेक्षा आहे.