धरणातील सद्यस्थितीतील सरासरी आवक १६००-१७०० क्युसेस दराने येत आहे. त्यामुळे धरण जलाशय पातळीमध्ये वाढ होत असून साधारण कल असाच राहिल्यास लोणावळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची दाट शक्यता आहे आणि द्वारविरहित सांडव्यावरून अनियंत्रित विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे धरणाच्या खालील बाजूस असलेले शेती पम्प, अवजारे, जनावरे, इतर तत्सम साहित्य वेळीच काढून घेण्याचे आदेश पाटबंधारे खात्याने दिले आहेत.

धरण परिसरात ११४ मिलीमीटर पाऊस

लोणावळा धरणाची पातळी बुधवारी सायंकाळी पाच वाजता ६२३.८८ मीटर होती. पाणीसाठा ८.८५८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५८.७४ टक्के होता.

Advertisement

धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्याचा कल गेल्या दोन दिवसांपासून जास्त असून काल अवघ्या आठ तासांत लोणावळा धरणावर ११४ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

लोणावळा धरणाचा सांडवा द्वारविरहित अनियंत्रित स्वरूपाचा असून पुढील २-३ दिवस अतिवृष्टी पर्जन्याचा कल हवामान विभागाने वर्तविलेला आहे.

टाटा कंपनीकडून महत्तम क्षमतेने म्हणजेच ८००-८५० क्यूसेस पाणी वीजनिर्मितीकरिता खोपोली वीजगृहात वळविण्यात येत आहे.

Advertisement

पावसाने धरला पुन्हा जोर

दोन आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून, लोणावळेकरांना पावसाने झोडपले असून, बुधवारी (ता. २१) सायंकाळी पाचपर्यंत दिवसभरात १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

लोणावळा परिसरात हंगामात आतापर्यंत एकूण दोन हजार ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर काही ठिकाणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार पावसामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू आहे.

Advertisement

लोणावळा नगरपालिकेचे तुंगार्ली, लोणावळा तलाव, टाटांच्या वळवण धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

 

Advertisement