Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

कंगणाविरोधात वाॅरंट काढण्याचा इशारा

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्या कथित बदनामीच्या प्रकरणात अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री कंगणा राणावत ही पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट काढण्याचा इशारा दिला.

काय घडले न्यायालयात ?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीत कंगणाने माझ्याविरोधात बिनबुडाचे आरोप केले.

तसेच माझी नाहक बदनामी करणारी विधाने केली’, अशी तक्रार अख्तर यांनी केली आहे. याविषयीच्या पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.

पूर्वी एकदा समन्स बजावूनही कंगणा हजर न राहिल्याने न्यायालयाने तिच्याविरोधात वॉरंट काढले होते. त्यानंतर तिने न्यायालयात हजेरी लावून जामीन मिळवला होता.

मंगळवारी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी असताना कंगणाच्या वकिलांनी या एका दिवसापुरती गैरहजेरीची मुभा देण्याची विनंती करणारा अर्ज सादर केला; तर कंगनाविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढावे, अशा विनंतीचा अर्ज अख्तर यांच्या वकिलांनी दिला.

सुनावणीला कायमच गैरहजर

‘कंगणा मुंबईत नसल्याने सुनावणीला हजर राहू शकली नाही. त्यामुळे गैरहजेरीविषयी मुभा द्यावी’, असे म्हणणे तिच्या वकिलांनी मांडले. त्याला अख्तर यांच्या वकिलांनी विरोध दर्शवला.

‘कंगना यापूर्वी केवळ जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात हजर राहिली होती. त्याव्यतिरिक्त ती सुनावणीच्या एकाही तारखेला हजर राहिलेली नाही’, असे अख्तर यांच्या वकिलांनी निदर्शनास आणले.

त्यानंतर न्यायालयाने अख्तर यांचा अर्ज फेटाळला; मात्र पुढील सुनावणीलाही कंगणा गैरहजर राहिल्यास त्यांना पुन्हा अर्ज करण्याची मुभा दिली. कंगणाला एका दिवसापुरती गैरहजेरीची मुभा देऊन पुढील सुनावणीला हजर राहण्याचेही निर्देश दिले.

 

Leave a comment