Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

खेड तालुक्यातील चासकमान धरण मंगळवारी (दि. ३) दुपारी ४ वाजेपर्यंत ९८.६६ टक्के भरले आहे. भीमाशंकर परिसरात मोठा पाऊस पडत असल्याने पाणी सोडण्याची वरिष्ठांची परवानगी मिळताच कोणत्याही क्षणी धरणातून भीमानदीत विसर्ग सोडला जाणार आहे.

भीमानदी कडेला राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन चासकमान पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता प्रेमनाथ शिंदे यांनी केले आहे.

खेड तालुक्यातील कळमोडी, चासकमान, भामा आसखेड या तीन धारणांपैकी कळमोडी १०० टक्के भरले आहे. तर चास कमान आणि भामा आसखेड धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

Advertisement

चास कमान धरण मागील वर्षी ३० ऑगस्टला भरले होते. यावर्षी मात्र जवळपास महिनाभर अगोदर भरले आहे. सध्या चासकमान धरण डाव्या कालव्यातून ५५० क्यूसेस वेगाने तर वीज प्रकल्पासाठी २०० क्यूसेस वेगाने पाणी सुरु आहे.

चासकमान धरण ९८.६६ टक्के भरल्याने स्थानिक धरण प्रशासनाने पुणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धरणातून पाणी सोडण्याची परवानगी मागितली आहे. परवानगी मिळतात धरणाखालील नागरिकांना सतर्क करून धरणाचे दरवाजे उघडून भीमा नदीत विसर्ग सुरु केला जाणार आहे.

धरणाखाली भीमा नदी कडेला राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. तर नदीमध्ये नदीकडेला असलेले शेतकऱ्यांचे मोटारी इंजिन व शेतीपूरक साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Leave a comment