विधानसभा अध्यक्षपदाची रणनीती लवकरच जाहीर करूः फडणवीस

‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घोषित होऊ द्या. घोषणा झाल्यावर भाजप आपली रणनीती जाहीर करेल. पहिल्यांदा राज्य सरकारचा निर्णय होऊ द्या. जोपर्यंत त्यांचा अध्यक्षपदाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच

5 आणि 6 जुलै रोजी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घ्यावी अशी मागणी काँग्रेससह विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं केली आहे.

याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होईल आणि विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होईल, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला.

दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलं आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

अध्यक्षपद रिक्त ठेवणं घटनाबाह्य

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. विधानसभा अध्यक्षपद इतक्या अधिवेशनानंतरही रिक्त ठेवणे हे असंविधानिक असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

बला महाराष्ट्रातच !

फडणवीस हे केंदात जाणार अशी चर्चा आहे. याबाबत विचारलं असता, आमच्या पक्षात आमचे नेते नरेंद्र मोदी जो आदेश देतील, तो सर्वांसाठी शिरोधार्ह असतो; पण एक गोष्ट सांगतो, की ज्याला भाजपचं, महाराष्ट्राचं राजकारण कळतं त्याला हे कळून येईल की, मी महाराष्ट्रातून कुठंही जाण्याची ही वेळ नाही.

माझ्या शुभचिंतकांना आनंद होतो, की मला दिल्लीत काही मिळेल; पण मी त्यांना सांगू इच्छितो, की माझी दिल्लीत जाण्याची शक्यता नाही.

काही लोकांना वाटतं की हा दिल्लीला गेला तर बला टळेल पण बला टळणार नाही, हे देखील मी स्पष्टपणे सांगतो, असंही फडणवीस म्हणाले.