ज्या प्रकरणात ईडी एकनाथ खडसे यांची चौकशी करत आहे, त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांचे मानसिक खच्चीकरण केले होते. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही झाली.

आता ‘ईडी’च्या माध्यमातून जाणूनबुजून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने ही चौकशी सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी केला.

मलिक यांचा भाजपला इशारा

खडसे यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावं लागलं. तब्बल ९ तास त्यांची चौकशी करण्यात आली. भोसरी येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी झाली. ही चौकशी सूडबुद्धीने केली जात असल्याची भावना खडसे यांनी बोलून दाखवली.

Advertisement

त्यानंतर मलिक यांनी भाजपला इशारा दिला. अशा प्रकारच्या यंत्रणा मागे लावून राजकीय गणितं बदलण्याचा प्रयत्न असेल तर तसं काहीही घडणार नाही, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.

भाजपच्या यंत्रणांना कुणीही घाबरत नाही

भाजपला जर वाटत असेल, की या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करून राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपचा गैरसमज आहे. कुणीही या यंत्रणेला घाबरत नाही, असं मलिक यांनी सांगितलं.

“ईडी किंवा इतर यंत्रणेमार्फत कितीही चौकशी लावली गेली तरी सत्य आज ना उद्या समोर येणार आहेच. खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही. त्यामुळे ते घाबरत नाहीत.

Advertisement

यंत्रणांचा दुरुपयोग करणं हे भाजपचं काम आहे. निव्वळ महाराष्ट्रच नव्हे तर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशमध्येही विरोधकांना त्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे”, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

 

Advertisement