शंभर कोटी रुपयांच्या खंडणीचे आरोप असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर छाप्याचे सत्र सुरू आहे. एक महिन्यानंतर ईडीने आज सकाळीच ईडीने छापे टाकले.

चुकीच्या वेळी, चुकीच्या गोष्टी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. आधी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर महिनाभरातच ईडीनेही देशमुखांच्या नागपुरातील घरावर धाड टाकली आहे.

त्यानंतर विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. सर्वांचं लक्ष कोरोनाकडे असायला हवं, चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत, असं वळसे पाटील म्हणाले.

Advertisement

अधिक भाष्य करण्यास नकार

“मी याबाबत जास्त बोलू इच्छित नाही. संबंधित यंत्रणा तपास करत आहे. चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. सर्वांचे लक्ष कोरोनाकडे असायला हवं.

कुणी काहीही मागणी केली, तरी चौकशी होत नाही. सीबीआय चौकशीसाठी मात्र राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल,” असं वळसे पाटील म्हणाले.

देशमुखांच्या अनुपस्थितीत छापे

देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

Advertisement

या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर दाखल करत ईडीने तपास सुरू केला होता. ईडीने आज सकाळी (शुक्रवारी) पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली.

या वेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात होते. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु झाले. या वेळी देशमुख घरी नव्हते, तर त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते.

Advertisement