माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणी न्या. दिनकर झोटींग अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे.

त्यांच्या जावयाला ईडीने अटक केली आहे. खडसे यांची चाैकशी सुरू आहे. त्यांच्या पत्नीला नोटीस बजावण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर खडसे यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेत पवार यांनी खडेस यांना काय दीक्षा दिली, हा आता आैत्सुक्याचा विषय झाला आहे.

Advertisement

भेटीची वेळ महत्त्वाची

खडसे यांनी आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते.

खडसे यांची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरू असून या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

खडसेंच्या अडचणीत वाढ

भोसरी एमआयडीसी येथील जमीन व्यवहार प्रकरणात खडसे यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. भाजप सोडून काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या खडसे यांच्यामागे सध्या चौकशीचा ससेमिरा सुरू आहे.

Advertisement

खडसे यांनी मंत्री असताना पदाचा गैरवापर केल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे. भोसरी येथील जमीन व्यवहार प्रकरणी अलिकडेच एकनाथ खडसे यांची तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली होती.

या चौकशीनंतर ईडीला तपासात आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले होते.

खडसेंच्या जावयाची कोठडी वाढली

दरम्यान, या प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांची कोठडी १९ जुलैपर्यंत वाढवली आहे.

Advertisement

जमिनीच्या व्यवहाराशी चौधरी यांचा थेट संबंध असल्याने पुढील तपास आणि अधिक चौकशीसाठी आणखी कोठडी आवश्यक असल्याचे आज ईडीकडून कोर्टात सांगण्यात आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट महत्त्वाची ठरली आहे.

राष्ट्रवातदीचे नेते ईडीच्या रडारवर

शरद पवार यांना नेमकं खडसे यांनी काय सांगितलं आणि पवार यांनी त्यांना कोणता सल्ला दिला, याबाबत अनेकप्रकारची चर्चा रंगली आहे.

प्रामुख्याने राष्ट्रवादीचे नेते सध्या ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असून पक्षात त्यावर आधीपासूनच खल सुरू आहे.

Advertisement

मुख्य म्हणजे खडसे यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर पवार तिथून वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले. तिथे या विषयावर चर्चा झाली की नाही, याबाबतही कोणतीच माहिती अद्याप मिळालेली नाही.

 

Advertisement