मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधीमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचे धाडस झालेले नाही. १७० आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय? यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे….असं ट्विट भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषददेखील रद्द केल्याने विरोधकांनी टीका केली आहे.

कृषी कायदे, आरक्षणासह अन्य मुद्यांवरून सत्ताधारी-विरोधक आक्रमक

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांबद्दल नापसंती, इतर मागासवर्गीय समाजाची (ओबीसी) सांख्यिकी माहिती मिळावी आणि मराठा आरक्षणासाठी घटनात्मक प्रक्रिया पार पाडावी, यासाठी सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी ठराव मांडून केंद्रातील भाजप सरकारविरोधात भूमिका घेणार आहे.

Advertisement

दुसरीकडे, काँग्रेसने मागणी करूनही या अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षांची निवड होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

मंत्र्यांचे कथित भ्रष्टाचार, मराठा आणि ओबीसींचे आरक्षण, लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थीची होणारी कोंडी आदी विषयांवर जाब विचारणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेतली जाईल या भीतीनेच सत्ताधाऱ्यांनी केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेतल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.

Advertisement

विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात ठराव करण्याचा निर्णय घेतला आहे.

अध्यक्षांविना तिसरे अधिवेशन

विधानसभा अध्यक्षांविना होणारे राज्य विधिमंडळाच्या इतिहासातील हे तिसरे अधिवेशन असेल. १९८० मध्ये शिवराज पाटील यांच्या राजीनाम्यानंतर हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविना पार पडले होते.

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर चालू वर्षांत मार्चमध्ये झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशनही अध्यक्षांविना पार पडले होते. यापाठोपाठ पावसाळी अधिवेशनही उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल.

Advertisement