नेत्यावरील श्रद्धा आणि प्रेमापोटी कार्यकर्ते काय करतील, याचा नेमच नाही. नेत्यावर जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते कधीकधी त्यांच्यासाठी जीवही देतात. दक्षिण भारतात ते वारंवार घडते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निस्सीम भक्ती असलेले अनेक जण आहेत. पवार यांना दैवत मानून त्यांच्या प्रतिमेची पूजा घरात करणारे आहेत. आता एकाने पवार यांचा मोठा टॅटू पाठीवर काढून घेतला आहे.
पवार यांनीही केलं कौतुक
अक्षय साळवे नावाच्या या समर्थकाने चक्क आपल्या शरीरावर शरद पवार यांचा चेहरा असलेला टॅटू काढला आहे. अक्षयच्या पाठीवरील टॅटू पाहून खुद्द पवारांनीही त्याचं कौतुक केलं.
कोण आहे हा चाहता?
प्रेमापोटी अक्षयने आपल्या संपूर्ण पाठीवर शरद पवार यांचा टॅटू काढला आहे. विशेष म्हणजे हा टॅटू कायमस्वरुपी आहे. संदीप जोशी या कलाकाराने हा टॅटू अक्षयच्या पाठीवर काढला.
अक्षय हा मूळचा बारामती तालुक्यातील मेदड गावचा रहिवासी आहे. तो सध्या मुंबईत व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला आहे.
साता-याच्या पावसातील सभेने गेला भारावून
विधानसभा निवडणुकांच्या वेळी साताऱ्यामध्ये शरद पवार यांनी प्रचार सभा घेतली होती. या सभेत पाऊस आल्यानंतरही त्यांनी पावसात भिजत सुरू ठेवलेलं भाषण प्रचंड गाजलं होतं.
यामुळे अनेक जण प्रभावित झाले होते. हे दृश्य पाहून अक्षयही भारावून गेला होता. त्याच वेळी अक्षयने मुंबईत हा टॅटू काढून घेतला होता.
दीड वर्षांनी अखेर पवारांची भेट
आपल्या पाठीवरील ही कारागिरी खुद्द शरद पवार यांनी पाहावी, अशी अक्षयची मनापासून इच्छा होती. गेले दीड वर्ष तो पवार यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होता.
अखेर रविवारी ही संधी चालून आली. अक्षयने शरद पवारांची भेट घेतली. दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर अक्षयने शरद पवारांना आपल्या पाठीवर काढलेला टॅटू दाखवला.