Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

अधिवेशनात आज काय घडणार ?

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधा-यांनी भाजपला बॅकफुटवर जायला भाग पाडलं. अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस असताना भाजप सत्ताधा-यांना कसा सामोरा जातो, याकडं लक्ष लागलं आहे.

प्रस्तावित विधेयकांवर कोंडी करण्याची शक्यता

पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

त्यातील काही विधेयके आज सादर केली जाण्याची शक्यता आहे. १२ सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

त्यातच राज्यपाल नियुक्त सदस्यांची निवड करण्याचा अंतिम अधिकार मंत्रिमंडळाचा असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला असल्याने आता सत्ताधारी पक्षाला भाजपवर कुरघोडी करण्याची संधी मिळाली आहे.

आत्मविश्वास नडला

अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडीत पकडलं, की भाजप बॅकफुटवर गेला.

अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी, अशा विषयांवरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची अशी कोंडी करणार की सरकारला प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ येणार असं चित्र होतं.

भाजपनेही पहिल्या अर्ध्या तासात आक्रमक होत याचे संकेत दिले; मात्र तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव विराजमान झाले आणि चित्रच पालटलं.

ओबीसी आरक्षणाच्या प्रस्तावावेळी गदारोळ करणाऱ्या आणि असंसदीय वागणूक करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन भास्कर जाधव यांनी केलं.

महाविकास आघाडीचे 12 आमदार राज्यपालांनी रोखून धरले, त्याचा बदला जाधवांनी 12 आमदार निलंबित करून घेतला, अशी चर्चा आहे.

दुसरीकडे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचं वागणं तालिबानी वागणं, असल्याचा हल्लाबोल केला. अशा प्रकारे अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला.

आज अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी कोणते प्रस्ताव सदनासमोर येतात. कोणते पारित होतात.

सत्ताधाऱ्यांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर कलगीतुरा रंगतो आणि भाजपच्या आमदारांवर केलेली कारवाई राहणार की सरकार मागे घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

 

Leave a comment