Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

फडणवीस हे नाव आलं कुठून, कसं पडलं? राज ठाकरे यांनी ऐकविला इतिहास

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९९ व्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत झालेल्या भेटींमधील किश्यांना उजाळा दिला.

या वेळी राज यांनी थेट ‘फडणवीस’ हे आडनाव कुठून आलं? हे आडनाव कसं पडलं? याचा इतिहासच ऐकवला.

पर्शियन भाषेतून अपभ्रंश

आपल्याकडे अनेक शब्द फारसी आहेत, ते आपल्याला माहीत नाहीत. अनेक आडनावं कशावरून आली हे माहीत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर ‘फडणवीस’ हे मुळात आडनाव नाही.

Advertisement

ते मूळचं पर्शियन नाव आहे ‘फर्द नलीस’. ‘फर्द’ म्हणजे कागद, ‘नलीस’ म्हणजे लिहिणारा. म्हणजे ‘फर्द नलीस’. नंतर ते फडावर लिहिणं आलं. म्हणून ते फडणवीस आलं, असं राज यांनी सांगितलं.

आडनावाच्या उगमात रस

आडनावं कशी असतात? ती कशी पडली? ती कुठून आली? यात मला रस आहे. हे कुठून आले? कसे आले? महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ कुठून आले? कसे आले? चपाती, पोळी कुठून आले? महाराष्ट्रात गहू नव्हता.

मग गहू आला कुठून? अशा अनेक गोष्टी असतात, त्या भूगोल आणि इतिहासाशी संबंधित असतात. बाबासाहेब या विषयावर माझ्याशी बोलले, त्याबद्दल मी मला भाग्यवंत समजतो, असं राज म्हणाले.

Advertisement

तेव्हाचे शब्द आता घ्यावेत का?

‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू’ हे शब्द म्हणजे तेव्हाची मराठी आहे. शब्द तेच आहेत. फक्त त्यात ळ किंवा ल मधला फरक आहे. ‘कैसी’ हा शब्द तिथे लिहिला ‘कैची’.

तो तेव्हाचा मराठी शब्द आहे. तो आता घ्यावा का? आताच्या मराठीप्रमाणे ‘कैसी’ त्या संदर्भात लिहावा, याबाबत बाबासाहेबांशी मागच्या भेटीत बोललो होतो, असं राज यांनी स्पष्ट केलं.

हिंदूंनी कसं वागावं हेच बाबासाहेब सांगतात

परवा त्यांना भेटलो. ते म्हणाले, आनंदी आहे; पण समाधानी नाही. ते खरंच आहे. ज्या ज्या वेळी मी त्यांना भेटलो, त्या त्यावेळी नवीन खजाना भेटल्याचं मला प्रत्येकवेळी वाटलं.

Advertisement

आपल्या छत्रपतींबद्दल अजून नवीन माहिती, इतिहासाबद्दल आणखी काही नवं बाबासाहेबांकडून आपल्याला ऐकायला मिळालं. मी लहानपणापासून त्यांची अनेक व्याख्याने ऐकली आहेत.

शिवछत्रपतींचं चरित्रं अनेकदा वाचून झालं आहे. मी ज्या ज्या वेळी त्यांचं व्याख्यानं ऐकली, आजही ऐकतो तेव्हा मला प्रत्येक वेळा वाटतं ते नुसतं शिवचरित्रं सांगत नाहीत. 2021मध्ये आपण कसं जगलं पाहिजे.

कसं सावध असलं पाहिजे, म्हणजे या देशातील हिंदूंनी, मराठी समाजाने किती सावध असलं पाहिजे, किती सतर्क असलं पाहिजे हे या इतिहासातून बाबासाहेब सतत सांगण्याचा प्रयत्न करत आले. त्यातून तो बोध घेणं महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले.

Advertisement

 

Leave a comment