सध्या अयोध्यतील राम मंदिर जमीन घोटाळा सर्वात मोठा असून ईडी तिथे चाैकशी का करत नाही, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.

केंद्रीय यंत्रणा मागच्या दाराने
“राज्यातील तपास यंत्रणा सक्षम असताना केंद्रीय यंत्रणा मागच्या दाराने आणल्या जात आहेत. केंद्रीय पथके येथे येतात आणि कोणाच्याही दबावाखाली येथे येऊन कार्यवाही करतात,

हे संघराज्य पद्धतीला हानीकारक आहे” अशी टीका त्यांनी केली. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून सुरु असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे विधान केले.

Advertisement

अयोध्येतील महापाैरांच्या नातेवाइकांकडून जमीन घोटाळा
“शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या जमीन व्यवहार प्रकरणात घोळ आहे, म्हणून त्यांना त्रास देत ‘ईडी’ने त्यांची चौकशी सुरू केली; पण सध्या सगळ्यात मोठा जमीन घोटाळा अयोध्येत श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यात झाला आहे.

अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांच्या नातेवाइकांनी कवडीमोल किंमतीने जमिनी घेतल्या व कोट्यवधी रुपयांना श्रीराम जन्मभूमी न्यासाला विकल्या. हा सुद्धा ‘ईडी’ किंवा ‘सीबीआय’ तपासाचा विषय आहे; पण ते सर्व मोकळेच आहेत” अशी टीका राऊत यांनी केली आहे.

सत्ता गेल्याने विरोधकांना नैराश्य
“विरोधी पक्षाने जबाबदारीनं वागावं अशी या जनतेची अपेक्षा आहे; पण जर ती जबाबदारी पाळत नसाल, तर आपण जनतेला ज्ञान देण्यात अपुरे पडत आहोत. आपल्यात काही कमतरता आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने कारवाया होत आहेत,” असे राऊत म्हणाले.

Advertisement

“सत्ता गेल्यावर ज्यांना नैराश्य आले आहे, त्यांनी नैराश्यातून आणि वैफल्यातून अशा प्रकारच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावला आहे. सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख नेत्यांवर ठरवून कार्यवाही केली जाते,” असे राऊत म्हणाले.