पुणेः शहरासह उपनगराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्याचे संतप्त पडसाद महापालिकेच्या सभेत उमटले. पाणी मिळत नसेल, तर लोकांनी जलसमाधी घ्यायची का, असा संतप्त सवाल नगरसेवकांनी केला.

नियोजनशून्य कारभार

शहराच्या मध्यवस्तीतील रास्ता पेठ, कसबा पेठ, मंगळवार, सोमवार पेठेसह कोंढवा, हडपसर आणि समाविष्ट ११ गावांमध्ये पाणी मिळत नाही. अशी तक्रार करीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रशासनावर हल्ला चढविला. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची सूचनाही नगरसेवकांनी मुख्यसभेत केली.
धरणामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी आहे; मात्र पाणीपुरवठा विभागाच्या उदासीन आणि नियोजनशून्य कारभारामुळे पाणी मिळत नाही.

प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे

याविषयावर शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, राष्ट्रवादीचे गफूर पठाण, बाबुराव चांदेरे, योगेश ससाणे, गणेश ढोरे, सचिन दोडके, मनसेचे वसंत मोरे यांनी प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. पाणी असूनही दिले जात नाही. एक ताससुद्धा पाणी दिले जात नसल्याचे जावळे, धनवडे यांनी निदर्शनास आणून दिले. पाण्याचे वेळापत्रक ठरविण्यात येत नाही. कोंढवा आणि हडपसर सारख्या भागातही पाणी देण्यात येत नाही.

प्रशांत जगताप म्हणाले, की १९९५ पासून पाण्याचा प्रश्न कायम आहे. पुणे स्मार्ट होत असताना पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. एसआरएच्या मोठ्या इमारतींमध्ये हंड्याने पाणी भरावे लागत आहे. लिफ्ट बंद आहेत; मात्र जिन्याने पाणी भरावे लागत आहे. ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी फॉर्म्युला तयार करण्याची आवश्यकता आहे.