गेल्या काही वर्षापासून राज्यात जोरदार पाऊस होत आहे. ढगफुटीसारखा पाऊस होत असल्याने महापूर येत आहे.
भूगर्भात काही बदल होत आहेत का, याचा अभ्यास राज्य सरकार करणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
तज्ज्ञांची समिती अभ्यास करणार
हवामान खात्याने अजूनही रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. निसर्गातील बदलाचे काही सांगता येत नाही. ग्लोबल वार्मिंगमुळे इथे घडतंय असं नाही. उत्तराखंडमध्येही घडतंय. जगातील चीन, जर्मनी यासारख्या देशातही घडत आहे.
अर्थात याबाबत सर्वांनी विचार करावा, असं सांगतानाच याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा झाल्याची माहिती पवार यांनी दिली. ज्याठिकाणी भूस्खलन झाले, तिथे कोणतंही खोदकाम किंवा वृक्षतोड झालेली नव्हती.
मग हे का घडलं? याचा अभ्यास करण्याकरीता तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
निधीची कमतरता भासणार नाही
अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये निर्णय घेऊन पूरग्रस्तांना मदतीचं वाटपही सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना त्या कामाकरिता जेवढी रक्कम खर्च करावी लागेल, ती खर्च करण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला आहे. निधीची कमतरता भासणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सर्वांनाच मदत देणार
काही भागात आजही पुराचे पाणी भरलेले आहे. त्यामुळे पंचनामे करण्यास अडचण निर्माण होत आहे; मात्र पाणी कमी झाल्याशिवाय त्या भागातील शेती पिकाची काय अवस्था आहे हे कळू शकणार नाही.
त्यामुळे जिथे पाणी ओसरले आहे, त्याठिकाणी पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. सर्वांना मदत देण्यात येईल, असा विश्वास पवार यांनी दिला.