ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाहीः शेट्टी

नीती आयोगाने उसाची रक्कम तीन हप्त्यात देण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने शेतक-यांना आपले मत कळवायचे आहे. उसाला तीन हप्त्यात भाव आम्हाला मान्य नाही. एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

वेळ पडल्यास राज्यव्यापी आंदोलन

ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यांनी त्यांच्या ऊसाची रास्त किंमत तीन हप्त्यात द्यावी असा केंद्राचा विचार आहे. या निर्याला आमचा विरोध आहे. राज्य सरकारनेही नीती आयोगाच्या निर्याला विरोध करावा.

वेळ पडल्यास राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना शेट्टी यांनी यासंदर्भात निवेदन दिले.

एकरकमी एफआरपी योग्य

पत्रकारांबरोबर बोलताना शेट्टी यांनी एफआरपीची मोडतोड करणे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारे आहे. असे सांगितले. नीती आयोगाने ही हप्त्याची शिफारस केली आहे.

अशा हप्त्यांमधून शेतक-यांचे त्यावर्षीचे पीक कर्ज फिटणार नाही, त्यामुळे त्याला १२ टक्के दराने व्याज द्यावे लागेल. त्यामुळे सध्या एकरकमी एफआरपी द्यावी लागते.

तेच योग्य आहे असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले. राज्याने या मोडतोडीला विरोध करावा अशी मागणी त्यांनी केली.

संचालक होण्यासाठी अट

राज्य सरकारने साखर कारखान्यांचे भागभांडवल १५ हजार रुपये केले. शेतकऱ्यांवर असा बोजा टाकण्याऐवजी कारखान्याचे संचालक व्हायचे असेल, तर २५ लाख भांडवल व २५ लाख कारखान्याकडे ठेव स्वरूपात, मुदत संपली की ते परत असा नियम व्हावा, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.

१५ हजार रुपयांचे शेअर्स घेऊन ३०० कोटी रुपयांचे मालक व्हायचे धंदे आता बास करायला हवेत असे ते म्हणाले.

दुधाचीही किमान किंमत ठरवा

साखरेची किमान किंमत ३१ रूपये किलो निश्चित केली. त्यापेक्षा कमी किंमतीत साखर विकणे कायद्याने गुन्हा ठरवला आहे.

आता दुधाच्या बाबतीतही हीच पद्धत राबवण्याचा विचार सुरू आहे. सर्वच शेती ऊत्पादनांबाबत सरकारने हीच पद्धत अवलंबावी असेही त्यांनी या वेळी सांगितले.

केंद्राच्या शेती कायद्यात दुुुरुस्तीची गरज

केंद्राच्या शेती कायद्यात दुुुरुस्तीची गरज आहे. परप्रांतीय धनदांडगे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करून नंतर पैसे देत नाहीत. त्यांच्याविरोधात दाद मागण्याची तरतूदच नाही. पाच कोटी बुडवायचे व दोन वर्षे कैद घेऊन ते पचवायचे हे बंद व्हावे.

त्यासाठी राज्याने कायदा करावा. केंद्राच्या कायद्यात घाईने दुरुस्ती करू नये. त्यासाठी शेतकऱ्यांचे मत विचारावे. दोन दिवसांच्या अधिवेशनात ही दुरूस्ती नको असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.

You might also like
2 li