शिवाजीनगरकडून येणाऱ्या मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम शनिवारी दुपारी कसबा पेठेपर्यंत पूर्ण झाले.

पहिल्या बोगद्याचे काम पंधरा दिवसांपर्वीच पूर्ण झाले आहे. कसबा पेठेतील साततोटी पोलिस चौकीसमोरच्या या जागेत मेट्रोचे नियोजित भूमिगत स्थानक आहे.

कर्मचाऱ्यांचा फटाके फोडून जल्लोष

जमिनीखाली ३३ मीटर अंतरावर खोदलेल्या खड्ड्यातून भुयाराचे खोदकाम करणारे टीबीएम (टनेल बोअरिंग मशिन) बाहेर आले.

Advertisement

प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, संचालक हेमंत सोनवणे तसेच मेट्रोचे अन्य अधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते. टीबीएम बाहेर येताच ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

दोन्ही बोगदे कसबा पेठेपर्यंत पूर्ण

मेट्रोचा भुयारी मार्ग शिवाजीनगर ते स्वारगेट असा सहा किलोमीटरचा आहे. त्यात दोन बोगदे ( जाणाऱ्या व येणाऱ्या मेट्रोसाठी) आहेत. कृषी महाविद्यालयाकडून बोगद्याचा उतार सुरू होतो. प्रत्यक्ष बोगदा शिवाजीनगरपासून सुरू होतो.

सिव्हील कोर्ट व नंतर मुठा नदीपात्र ओलांडून आता दोन्ही बोगदे कसबा पेठेपर्यंत पूर्ण झाले आहेत. नदीच्या तळापासून खाली १३ मीटर अंतरावरून दोन्ही बोगदे पुढे कसबा पेठेपर्यंत आले आहेत.

Advertisement

मेट्रो धावण्यासाठी अजून दीड वर्ष

स्वारगेटकडूनही या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्यातील एक बोगदा मंडईपर्यंत आला आहे. त्याचे काम आता पुढे कसबा पेठेपर्यंत येईल.

स्वारगेटकडून येणाऱ्या दुसऱ्या बोगद्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. कसबा पेठेतील नियोजित स्थानकार हे चारही बोगदे एकत्र झाले, की मेट्रोचा सहा किलोमीटरचा सलग भुयारी मार्ग पूर्ण होईल.

भुयारी स्थानकांच्या कामासहित संपूर्ण काम पूर्ण होऊन भुयारातून मेट्रो धावण्यासाठी अजून वर्ष ते दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Advertisement