पुणे – नुकतंच पार पडलेल्या दुसऱ्या जागतिक आंतर कारागृह स्पर्धेत (Online Chess Tournament) भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्याच्या येरवडा (Yerwada ) मध्यवर्ती कारागृह संघाने एल सालव्हाडोर संघाचा 3-1 गुणांनी पराभव करत कांस्यपदक पटकावले. तर, फिलिपिन्सने कोलंबिया चा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. जगभरातील 46 देशांमधील 64 कारागृहांचे संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. या आधी 30सप्टेंबर व 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या अखिल भारतीय आंतर कारागृह स्पर्धेत येरवडा जेल व प्रयागराज जेल ने अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून जागतिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत प्रवेश निश्चित केला होता.

केवळ दुसऱ्यांदाच होत असलेली जागतिक ऑनलाईन आंतर कारागृहा स्पर्धा (Online Chess Tournament) ही दोन स्तरांवर खेळवण्यात आली. 64 संघांची आठ गटात विभागणी करून त्यांच्यात साखळी स्पर्धा घेण्यात आली.

यामध्ये येरवडा संघाचा समावेश प्रथम गटात होता. या गटात झालेल्या सात सामन्यात येरवडा संघाने 5 विजय 1 बरोबरी व 1 पराभव अशी कामगिरी करत गटातून उपविजेते पद मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

आठ गटातील प्रथम दोन असे 16 संघ अंतिम फेरी साठी निवडण्यात आले. त्यांची दोन गटात विभागणी करून परत एकदा साखळी सामने घेम्यात आले. या स्पर्धेत देखील येरवडा संघाने 5 विजय 1 बरोबरी व 1 पराभव स्वीकारत उपविजेते पद प्राप्त केले.

यामध्ये येरवडा संघाने माजी विजेत्या मंगोलिया चा 3-1 ने पराभव केला, स्पर्धा विजेत्या फिलिपिन्स ला 2-2 असे बरोबरीत रोखले व झिम्बाब्वे संघाकडून 1-3 ने पराभव स्वीकारला.

या गटातील विजेते फिलिपिन्स संघ व दुसऱ्या गटातील विजेते कोलंबिया संघ यांमध्ये प्रथम दोन क्रमांकाची लढत झाली. दोन्ही गटातील उप विजेत्यांमध्ये तृतीय व चौथ्यां क्रमांकाची लढत झाली या लढतीत येरवडा संघ विजयी ठरला व कांस्य पदक पटकावले.

या वर्षी प्रथमच भारतामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड ( IOCL ) ने ‘प्रिझन टू प्राईड’ या उपक्रमा अंतर्गत भारतातील 21 कारागृहातील बंदीनसाठी बुद्धिबळ प्रशिक्षण कार्यक्रम राबविला होता.

केतन खैरे यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृह संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून महत्वाची भूमिका निभावली. त्यांना सहप्रशिक्षक सागर मोहिते यांनी मोलाची साथ दिली. संपूर्ण स्पर्धेचे नियमन हे मुख्य पंच पवन कातकडे यांनी केले व स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडली.

गणेश माळकरी यांनी संपूर्ण स्पर्धे दरम्यान कंप्युटर व इंटरनेट नेटवर्क सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पार पाडली. IOCL चे योगेश परदेशी यांनी येरवडा कारागृह संघाचे व्यवस्थापन केले व सुरुवातीपासून सर्व उपक्रमाचे काटेकोर नियोजन केले.