दिसेल, त्याच्यावर दोघे करीत सुटले वार

आधीच मर्कट त्यात मद्य पिला, असे म्हणतात. माणसालाही ही म्हण लागू शकते. मद्यांचा अंमल जास्त झाला, तर कोण काय करील, याचा भरवसाच देता येत नाही.

मद्याच्या आहारी गेलेल्या दोन तरुणांनी हातात धारदार शस्त्र घेऊन समोर येईल, त्याच्यावर वार करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे काळजाचा थरकाप उडताना दिसतो आहे.

पिंपळे निलखमध्ये घडलेला प्रकार

गुंडांच्या दहशतीचा काळजाचा थरकाप उडविणारा एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन फिरताना दिसत आहेत.

ते समोर दिसेल त्याच्यावर वार करीत आहेत. सांगवी परिसरातील पिंपळे निळखमध्ये काल रात्री हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

तरुणांची ओळख पटली

दारूच्या नशेत असलेले हे तरुण आपल्या हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यामध्ये गोंधळ घालत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहन चालकांना धमकावून त्यांच्यावर वार करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान या धक्कादायक प्रकारात प्रतीक खरात आणि चेतन जावरे नामक तरुणांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

संबधित दोन्ही तरुण फरार झाले आहेत आणि त्यातील एका व्यक्तीविरोधात एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि दहशत पसरविण्यासाठी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिली आहे.

दारूच्या नशेत कृत्य

अशा प्रकारे दहशत माजविण्याऱ्या या दोन्ही तरुणांवर या आधी कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा ते कोणत्या गुन्हेगार टोळीशी संबधितही नाहीत. त्यांनी दारूच्या नशेत हे कृत्य केलं असावं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

एक जखमी

असं असलं तरीही या आरोपींनी त्यांच्याकडील धारदार शस्त्राने एकाच्या डोक्यावर जबर वार केल्याने तो व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

रस्त्यांवर गर्दी असतानाही हे गुंड धारदार शस्त्र घेऊन फिरत होते. अशा वेळी पोलिस यंत्रणा कुठे होती, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.