राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेमधून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

त्यासाठी अर्जदारांकडून योग्य कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त होताच नवीन घरगुती वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१४ एप्रिलपासून ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना घरगुती नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना सुरू केली आहे.

Advertisement

या योजनेमध्ये लाभार्थी अर्जदारांना वीजजोडणीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याची सोय आहे. लाभार्थ्यांना या योजनेमधून घरगुती वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणकडे एकूण ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

ही रक्कम देखील पाच समान मासिक हप्त्यांमध्येच वीजबिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेबाबत अधिक माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृषिपंपाच्या वीजजोडण्यांसाठी विविध योजना- घरगुती वीजजोडणीसह कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्यांसाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांना विविध योजनांच्या माध्यमातून महावितरणकडून प्राधान्य देण्यात येत आहे.

यासोबतच अनुसूचित जाती/ नवबौद्ध आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून अनुक्रमे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येत आहे.

Advertisement

या योजनांमध्ये नवीन विहिरीसह कृषिपंप संच आदींसह नवीन वीजजोडणी आकाराचा समावेश केला आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावांप्रमाणे संबंधित लाभार्थ्यांना देखील महावितरणकडून तातडीने कृषिपंपांची वीजजोडणी देण्यात येत आहे.