व्यायामासाठी टेरेसवर गेलेल्या तरुणाने टेरेसवरुन उडी मारून आत्महत्या केली. रविवारी (दि. २०) रात्री साडेआठच्या सुमारास घरकुल चिखली येथे ही घटना उघडकीस आली. रवीकुमार अलाप्पा बलीजा (वय २०, रा. घरकुल, चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलीजा हा घरकुल येथे त्याच्या कुटुंबियांसोबत राहण्यास आहे. तो रहात असलेली इमारत सात मजल्यांची असून, त्या इमारतीच्या टेरेसवर काही जण नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जातात.

त्यानुसार रवीकुमार हा रविवारी सायंकाळी इमारतीच्या टेरेसवर व्यायामासाठी गेला. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास त्याने टेरेसवरुन उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले.

मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.